उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी करीत वाल्मिकी समाज तसेच वंचित बहुजन आघाडीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी योगी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरज येथे एका तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत आहे. वाल्मिकी समाजाने योगी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. या घटनेने वाल्मिकी समाजात प्रचंड संताप खदखदत असल्याने योगी सरकारने राजीनामा द्यावा अशीही जोरदार मागणी यावेळी समाज बांधवांनी केली.
वंचित बहुजन आघाडीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. योगी सरकारच्या राज्यात उच्चवर्णीयांचे अत्याचार वाढले आहेत. मागासवर्गीय समाज भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तरुणीवर अत्याचार आणि हत्या केल्यानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नव्हता. संघटनांचा दबाव आल्यानंतर योगी सरकार हलले, योगी सरकारने संविधानाशी द्रोह केल्याचे आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी आघाडीचे शहर उपाध्यक्ष भगवान खिल्लारे, समाधान खिल्लारे, विनोद गायकवाड, संजय जाधव, राहुल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.